Tuesday, November 8, 2011

निसटलेले तुझे शब्द वाचताना 


मी हि निसटत निसटत गेले 


शब्दातले तुझे भाव वेचताना 


प्राण माझे विस्कटत विस्कटत गेले 
.
..अंतर्नाद

Friday, September 23, 2011


आहे सदैव काही ... माझ्यात आटलेले
वेगात धावणार्या .. भेटेल का तुला ते ?

धारा खुळ्याच माझ्या .. आभाळ ही खुळेसे
या श्रावणात मेघा .. पेलेल का तुला ते ?
...अंतर्नाद

मधुरा मी


मधुरा मी तुझ्या हास्याची
अन मधुगंध तू अंतरंगाचा
मुक्त तुझ्या मनाच्या आसमंती
मी खग शुभ्र पंखाचा

किनारा मी तुझ्या हृदय तरंगाचा
अन केशर साज तू मम संध्येचा
मावळत्या वेळी उगाच काहूरलेला
मी क्षण तुझ्या स्पन्दाचा

अधोरेखित मी शब्द तुझ्या लेखणीचा
अलिखित सारांश तू मम काव्याचा
आकंठ जे बुडाले अन विरून गेले
मी ..श्वास त्या प्राणांचा

......... अंतर्नाद
तुझे नेहमीचेच निमित्त
"पाणीदार आहेत तुझे डोळे "
म्हणताना आजही शोधतोस
माझ्या मनात काही आटलेले ...

मी छाटत असते काही फांद्या
छोट्याश्या झुडुपाच्या
अन म्हणते " हे सुंदर वाढण्यासाठी
बरे असते थोडेसे छाटलेले "

"चित्रकार आहेत तुझे शब्द
रेखाटतात किती रेखीव चित्रे
तू बोलताना रंग होतात अश्रू
आणि अश्रूच होतात कुंचले "

तुझी रेखीव दाद ...ऐकल्यावर
निक्खळ निखळ हसते मी अन ...
मनाच्या कॅन्वासवरचे सुकलेले चित्र
पुन्हा निमित्ताने होत असते ओले ....
..........अंतर्नाद.
तुझे नेहमीचेच निमित्त
"पाणीदार आहेत तुझे डोळे "
म्हणताना आजही शोधतोस
माझ्या मनात काही आटलेले ...

मी छाटत असते काही फांद्या
छोट्याश्या झुडुपाच्या
अन म्हणते " हे सुंदर वाढण्यासाठी
बरे असते थोडेसे छाटलेले "

"चित्रकार आहेत तुझे शब्द
रेखाटतात किती रेखीव चित्रे
तू बोलताना रंग होतात अश्रू
आणि अश्रूच होतात कुंचले "

तुझी रेखीव दाद ...ऐकल्यावर
निक्खळ निखळ हसते मी अन ...
मनाच्या कॅन्वासवरचे सुकलेले चित्र
पुन्हा निमित्ताने होत असते ओले ....
..........अंतर्नाद.

Saturday, September 17, 2011

सोबत तुझी

सोबत तुझी
म्हणजे मैफल जगण्याची
.. गाफील चांदण्यात
. . स्पर्शीक सुरेल खोडी
... चंद्राच्या शीतल किरणांची

सोबत तुझी
म्हणजे कविता आयुष्याची
...अबोल शब्दपल्लवी कधी
.. बोलक्या शहरात खुळी अबोली ..

सोबत तुझी
म्हणजे ..उर्मी जगण्याची
....तुला मी अन मला तू
... ओढ समजून घेण्याची

सोबत तुझी ...
म्हणजे.... ओळख वेदनेची
सांगड मनातल्या प्रीतीची
दुराव्यातल्या भीतीची

सोबत तुझी ....
म्हणजे ...ताण कोकिळेची
.. मधुर गोड पहाटे जाणीव
... स्वतःलाच स्वतः भेटण्याची

..................अंतर्नाद
.

Friday, July 1, 2011

असेही

आरोप फार झाले .....शब्दांवरी असेही
आता अबोल झाले .... ते हुंदके तसेही

शोधू नकोस जीवा .... खाणाखुणा मनाच्या
झाले गहाळ जे ते .... माझे तसे नसेही

काहूर दाटलेला .... घायाळ सांजवेळी
हो थेंब थेंब आता ..... आभाळ हो कसेही

वाटेत ओळखीच्या ... देईल हाक कोणी
मी थांबले कितीदा ... झाले जरी हसेही

जाळू अहं जरासा ... थोडा उजेड आणू
काळोख हा कितीसा .... राहू कसेबसेही

..................... अंतर्नाद

कसा?

नको ओलावूस पापण्या
भार आसवांचा साहू कसा?
कंठात रुतलेल्या शब्दांचा
अर्थ आता लाऊ कसा ?

दोन घडीचे मौन ते
वेल्हाळ वेल्हाळ जीव झाला
विस्कटला स्पंद नाद तो
शब्दात सारा मांडू कसा ?

भाषांतरे मी किती केली
उसासे अन त्या श्वासांची
अक्षरांच्या लयीत पुन्हा
आर्त सूर तुझा आळवू कसा ?

दूर जाणे माझे ठरलेले
अन ठरलेली व्यथा जीवघेणी
भेटून तुला नव्याने विरह तोच
पुन्हा पुन्हा देवू कसा ?

अंतर्नाद ( मनीषा )

फार काही नाही

फार काही नाही
दोन हक्काचे अश्रू असावेत
नसेल जेव्हा कुठेही मी
एकांतात ओघळणारे असावेत

फार काही नाही
दोन गोंडस शब्द असावेत
"कुठे आहेस ? .. "म्हणून
दोन डोळे शोधणारे असावेत

फार काही नाही
चुकणार्या ठेक्यांचे दोन स्पंद असावेत
लय बदलता माझ्या श्वासांची
अचूक स्पंदने हेरणारे असावेत

फार काही नाही
दोन हात विश्वासाचे असावेत
जेव्हा अविश्वासाचे उठेल वादळ
ठाम अढळ नजरेचे स्पर्श असावेत ..

फार काही नाही ..............
अनोळखी जेव्हा स्वतःशीच होते
"मी ओळखतो ग तुला"
ओळखीचे नेहमीचे तुझे शब्द असावेत
अंतर्नाद (मनीषा )

या श्रावणात

या श्रावणात माझ्या ... ओठी न गीत आले
मी जन्मले नव्याने .... सोडून प्रीत आले

ना त्या नदीकिनारी ... मी शोधले कुणाला
ना मी लपून गेले ... येता ना भीत आले

सोडून दूर जाता .... डोळेच हासले ते
प्रेमात आसवांची .. मोडून रीत आले

आनंद मी कशाला ... गैरा खिश्यात ठेवू
मी फाटक्या घटीका .. खोडून नीत आले

पैजा अजून बाकी ... माझ्या तुझ्या नशीबा
तू काय खेळशी? मी ... हारून जीत आले

........अंतर्नाद (मनीषा )

Sunday, June 5, 2011

भलेभले

खरे कुणा न आवडे .... मुके इथे भलेभले
विश्वास ना कुणावरी .. फुके इथे भले भले

विसंबले सुखा सुखी ... कशास रोपटे तरी
खुशाल सावलीतले .... सुके इथे भलेभले

फिकीर कारणे उगा ... फकीर प्रेम आपले
हि प्रेमवाट साजणे ... चुके इथे भलेभले

फुकाच मानपान हा ... उगाच अंह बावळा
अस्तास सांज येइतो... झुके इथे भलेभले

न ती तहान भागली ... न ती उजाण थांबली
नवीस घास शोधण्या ... भुके इथे भले भले

............. अंतर्नाद [
मनीषा ]

***** राख *****

घराला घराची .... व्यथा भार झाली
सुखाची दुकाने .... जगी फार झाली

कवाडा कुलूपे ... झरोख्यास जाळी
अबोल्यात नाती ... हद्दपार झाली

जराही नसावा .. तुला खेद काही
तुझी बेफिकिरी .. छुपा वार झाली

किती खोल होती ...मुळे बंधनांची
जिव्हाळ्यास माती ... निराधार झाली

नको आज नेऊ ... जुन्या त्या दिशेने
'मनी ' राख माझ्या ... नसे गार झाली

..............अंतर्नाद [मनीषा ]

***** भेटणे हे शेवटीचे *****

भेटणे हे शेवटीचे , काढली ती खोड का रे ?
गायले ते पेललेना ,गीत राही गोड का रे ?

सोडले मी मोजणे जा , तोडलेल्या अंकुराना
खोल माती वेदनांची , आसवांचे मोड का रे ?

सांधणे आता नको ते , जोडणे पुन्हा न आता
अंतरी धागा न दोरा , फाटली ती जोड का रे ?

मी उसासे बांधलेले , श्वास काही ठेवलेले
बंधने नाही कशाची , प्राण गाती सोड का रे ?

ठेव नाही कोणतीही , भाव नाही घाव नाही
तोडले गोडीत सारे , तोडण्या या ' तोड ' का रे ?

ताणलेले दोर होते , ना कळाले का मलाही ?
ठेवले जाता पुरावे , बोल हाती फोड का रे ?

........... अंतर्नाद ( मनीषा )

आताशा .

आताशा .. मधुकुंज एक स्वप्नात येते

गुज कुणाच्या मनीची साद होते ...

अंगणात त्या इवल्याश्या घराच्या

अबोली अन तुळशीची रोज भेट होते ..

आताशा .. ती माती आपलीशी वाटते

खोलवर ओल तिची माझी तहान होते

तिच्या रांगडी बोलीची भाबड्या मनाची

जाणत्या मनास माझ्या ओढ लागते

आताशा .. पुन्हा जसे स्वप्न पडावं मातीला

आभाळातल्या थेम्बा थेम्बा चं

एक आवर्तन संपाव अन सुरु व्हावं

ऋतूचक्राचं .. तुझ्या शब्दांच .. माझ्या स्पंदणाचं

...नकळत एक रेशीम बंध होते

****** अंत नाही ******


कोमेजली फुले ती .... सारीच खंत नाही
गंधाळल्या क्षणांना ... नाहीच अंत नाही

त्याच्या अबोल ओठी ... घायाळ दाद होती
काव्याहुनी न माझ्या ... मी भाग्यवंत नाही

ही रात्र चांदण्यांची .... डोळ्यात राहू दे ना
आभाळ शून्य झाले ... तारे अनंत नाही

मांडू नकोस पुन्हा .... माझ्या कथाव्यथा त्या
वाचायला नव्याने .... आता उसंत नाही

त्त्याच्याच ओंजळीने ....छाटीत स्वप्न गेले
हाती न मावले ते .... त्याला पसंत नाही

आशेत जीवनाच्या .... वाटेत सांज झाली
अंधारल्या 'मनीषा' .....काही जिवंत नाही

अनोळखी शहरात कधी
ओळखीच्या गावात
ओसाड राना वनात कधी
हिरव्यागार मळ्यात
तहानलेल्या उष्ण दुपारी कधी
संध्या शीतल रंगात
आठवांचे धावून आले थवे
घेऊन नेहमीच निमित्त नवे .....

गहिवरल्या कंठात कधी
कुणा हसर्या डोळ्यात
भारावलेल्या सुरात कधी
हरवलेल्या जुन्या गीतात
बहरून आलेल्या मैफिलीत कधी
दाटून आलेल्या एकांतात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे

डायरीच्या पाना पानात कधी
अर्धवट कवितांच्या शब्दात
क्षितिजांच्या स्वप्नात कधी
कधी तुझ्या घराच्या अंगणात
माझीच मी फक्त असते जेव्हा
अन नसते जेव्हा मी माझ्यात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे

प्रत्येक श्वास माझा बहानाच नवा
तुला आठवण्याचे तुला स्मरण्याचे
तू जवळ असताना हि माझ्या
कधी तू जवळ नसताना
तुझ्या नकळत्या प्रेमात कधी
कधी तुझ्या जाणत्या द्वेषात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे

उत्कंठा

शब्द अडखळतात हल्ली
लेखणी हि लाजते जराशी
घेवून येतोय सरी तो पुन्हा
अन काही भिजरे भाव उराशी

टिपटिप रिमझिम नाद हल्ली
गुंजन ओले थेंब थेंब गाई
गारठते गारव्यात स्मृतींच्या ती हि
अरे तीच ती उबदार ओसरी

निमित्त झालंय तुझ्या चाहुलीचे
उसासे हि थंड झुळूक्दार झाली
लगडलीत किती हिरवी स्वप्ने
झुबकेदार झाल्या शब्दांच्या वेली

आगमनाची वाट आता
सोहळा प्रतीक्षेचा क्षणो क्षणी ठायी ठायी
ये रे श्रावणा .. निळ्या सावळया घना
उत्कंठा पुन्हा तुझ्यात चिंब होण्याची होई
.
भेटूनही तुला का
भेटणे तसे बाकीच उरावे
पाहूनही तुला का
पाहणे तसे बाकीच रहावे
जगणे होते या आधीही
सोबतीचे चार क्षण जणू
जगणे तसे बाकीच असावे ..

तुझ्या अत्तरी स्पर्शात
गंधाळलेले श्वास माझे
सत्यात येऊनही स्वप्न भेटींवर
धुंदीचे .आभास असावे
तुझ्या ओठांवर विरघळून हि
माझ्या ओठांवरचे ते तुषार
तहानलेलेच असावे ..

हे निमित्त कसले
तुझ्या माझ्या भेटीचे
एका सहज भेटीतून
पुन्हा पुन्हा भेटण्याचे
अनंत निमित्त फुलावे
भेटूनही कुणाला का
भेटणे तसे बाकीच असावे ..!

कधी स्पर्श शब्द झाले
कधी शब्द स्पर्श झाले
अंतर्नादातून उमटल्या
लहरींचे संवाद झाले कितीही
तरी बोलणे तुझे माझे
असे का बाकीच असावे ..!
भेटूनही कुणाला का
भेटणे तसे बाकीच असावे ..!

एक मधाळ हास्य
ओठांच्या किनारीतून सांडणारं
मऊ मऊ झुळूक पिवून
केसांच्या बटांचे लडिवाळ होणं
तुझ्या भरभरून शब्दा नंतर
दृष्टा दृष्टीत एक रेखीवसं
पूर्ण विराम तुला दिसणं
नको मला दोष देऊ नको
हि निमित्त सगळी येतात आपोआप
माझ्या मनात मुळीच नाही
.........तुला फसवंणं

शब्दांच्या जाळ्यात
संवांदांचे फितूर होणं
मौनांच्या रिक्त जागेतल्या हि
संवादाला अर्थ येणं
कधी तुझी उर्मी तर
कधी माझ्यां वर्मी
लागलेल्या घावानांही
आपूलकीचा सुगंध येणं
नको मला दोष देऊ नको
माझ्या मनात मुळीच नाही .
... तुझी मौन कविता होणं

चालता चालता
पावलांच थांबणं
चांदण स्पर्शात अनाभिद्न्य
कण कण चांदणं होणं
मिटलेल्या पापण्यात
जणू निमंत्रण स्वप्नाना
गुलाबही आभाळ होऊन देणं
नको मला दोष देऊ नको
हि निमित्त सगळी येतात आपोआप
माझ्या मनात मुळीच नाही
... तुझं स्वप्न होणं