अनोळखी शहरात कधी
ओळखीच्या गावात
ओसाड राना वनात कधी
हिरव्यागार मळ्यात
तहानलेल्या उष्ण दुपारी कधी
संध्या शीतल रंगात
आठवांचे धावून आले थवे
घेऊन नेहमीच निमित्त नवे .....
गहिवरल्या कंठात कधी
कुणा हसर्या डोळ्यात
भारावलेल्या सुरात कधी
हरवलेल्या जुन्या गीतात
बहरून आलेल्या मैफिलीत कधी
दाटून आलेल्या एकांतात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे
डायरीच्या पाना पानात कधी
अर्धवट कवितांच्या शब्दात
क्षितिजांच्या स्वप्नात कधी
कधी तुझ्या घराच्या अंगणात
माझीच मी फक्त असते जेव्हा
अन नसते जेव्हा मी माझ्यात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे
प्रत्येक श्वास माझा बहानाच नवा
तुला आठवण्याचे तुला स्मरण्याचे
तू जवळ असताना हि माझ्या
कधी तू जवळ नसताना
तुझ्या नकळत्या प्रेमात कधी
कधी तुझ्या जाणत्या द्वेषात
आठवांचे धावून आले थवे
नेहमीच घेऊन निमित्त नवे
No comments:
Post a Comment